पुणे: भारतीय जनता पक्षाकडून वारंवार लोकसभा निवडणूकीत यंदा ४०० पार असा सांगितले जात आहे. राज्यघटनेत बदल करण्यासाठीच त्यांना ही संख्या गाठायची आहे असे त्यांच्याच एका वजनदार मंत्र्यांचे अलीकडेच सांगितले. ही बाब देशाच्या दृष्टिने चिंताजनक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर इडी कारवाईची दहशत बसवली जात आहे असा आरोपही त्यांनी केली.
मोदी बाग या पुण्यातील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) राज्य प्रवक्ते तसेच खासदार वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, सन २०१४ ते २०२२ या काळात भाजपच्या सरकारने देशात १३१ जणांवर कारवाई केली. त्यामध्ये भाजपचा एकही मंत्री नाही. काँग्रेसने सन २०१४ ते २०१४ या काळात २६ कारवाया केल्या. त्यात ५ काँग्रेसचेच मंत्री होते. याचा अर्थ डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ईडीची गैरवापर झाला नाही असा तर आहेच, पण यांच्या काळात ईडी आयुधासारखी वापरली जात आहे असाही आहे.
राजकीय हेतूने, सुडापोटी या गोष्टी केल्या जात आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांच्या कारवाईत काय आढळले? विरोधी पक्षाच्या अनेक उमेदवारांवर त्यांनी निवडणुकीला उभेच राहू नये यासाठी इडीचा दबाव टाकला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्यावरील कारवाई तेच सांगते आहे. रविंद्र वायकर शिंदे गटात केले. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू होती, आता ती थांबली. हा प्रकार काय आहे? असा प्रश्न पवार यांनी केला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पवार यांनी इडीच्या कारवाईची आकडेवारी असलेली कागदपत्रेच पत्रकार परिषदेत सादर केली.
आमदार निलेश लंके पुन्हा आमच्याकडे येणार का ते माहिती नाही. बाहेर गेलेले बरेच लोक अस्वस्थ आहेत हे खरे आहे असे पवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या हेतूबाबत शंका घेणार नाही. ते आमच्याबरोबर बोलतात, आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो आहोत. त्यामुळे यावर आताच बोलणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. देशस्तरावर त्यात्या पक्षाने बोलणी करावीत असे ठरले आहे. त्याप्रमाणे चर्चा सुरू आहेत. कोल्हापूरातून शाहू महाराज यांनी उभे रहावे असा मी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे. ते उभे राहिले तर आनंदच आहे असे पवार म्हणाले.