पुणे : मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे किशोर आणि अभयही दोन मुले, दोन सुना, तीन नातवंडे असा परिवार आहे. चारुकाका यांचे पार्थिव शनिवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पूना गेस्ट हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता वैैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.भालजी पेंढारकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाºया चारुकाकांना लष्करात भरती होण्याची इच्छा होती. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिट्री स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पूना गेस्ट हाऊसची धुरा त्यांनी सात दशकांहून अधिक काळ समर्थपणे सांभाळली. रंगभूमी आणि चित्रसृष्टीचा चालता-बोलता आलेख अशी ओळख असलेले चारुकाका अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते.सात वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनी चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘घर गंगेच्या काठी’ आणि ‘जावई माझा भला’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.जीवा-सखा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी पहिल्यांदा पुण्यात आले होते, त्यावेळी पूना गेस्ट हाऊसला थांबले होते. चित्रीकरणासाठी मला कोल्हापूरला जायचे त्याच वेळी पानशेत धरण फुटल्याने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मी ही त्यात अडकले. मी सुरक्षित आहे, असे मला मुंबईला फोन करून सांगायचे होते. मी फोन करण्यासाठी पूना गेस्ट हाऊसला गेले. तेथे अक्षरश: गर्दीने हॉटेल भरले होते. चारूकाका मात्र भाकरी आणि बेसन करुन रात्रभर लोकांना जेवायला घालत होते. मलाही त्यांनी तेथेच थांबवून घेतले. त्यांच्या आईच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली. - सुलोचना, ज्येष्ठ अभिनेत्रीज्या ज्या वेळी चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांवर सकंट कोसळले त्या त्या वेळी चारूदत्त सरपोतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते प्रेमळ होते. त्यांच्या जाण्याने कलाकारांचे आश्रयस्थान हरवले आहे.- लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्रीचारूकाका हे कलाकारांचा आधारस्तंभ होते. अनेकांना त्यांनी जगण्याचा आधार दिला. त्यांना गमावणे म्हणजे मायेची सावली हरवल्यासारखे वाटत आहे.- कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ गायिका
चारुकाका सरपोतदार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:01 AM