पुणे : किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेसमोरील परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
यश शाम आसवरे (वय २०, रा. कोंढवा) असे अटक आराेपीचे नाव आहे, तर शकिल गुलाब शेख (४४, रा. कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार रणजित शिंदे यांनी फिर्याद दिली असून, ही घटना शनिवारी (दि.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.
मृत शकील शेख हा मिळेल ते काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि. १७) रात्रीच्या वेळी गाडगे महाराज शाळेसमोरील मैदानात शकील थांबला होता. त्यावेळी यश आणि त्याचे दोन साथीदारदेखील त्या मैदानावर होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर शकील तेथील पडीक खोलीमध्ये पळाला. पाठोपाठ आरोपींनी त्या खोलीमध्ये जाऊन त्याला मारहाण केली.
या मारहाणीत शकीलच्या छातीत, हनुवटीवर, तसेच डोक्यात मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. कोंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.