चासकमान : खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे पाचही दरवाजे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता बंद करण्यात आले. हे धरण ५ आॅगस्टला शंभर टक्के भरले आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरासह कळमोडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात संततधार पडत असलेल्या पावसामुळे आरळा नदीबरोबरच भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून अधूनमधून सांडव्याद्वारे विसर्ग वाढविण्यात येत होता. परंतु मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरींवर सरी वगळता पावसाने दडी मारल्याने धरणाचे पाचही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तसेच शिरूर तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण असल्याने म्हणावा तसापाऊस न झाल्याने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार धरण प्रशासनाने आवर्तन सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ६०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.