किरण शिंदे
पुणे: सीकिंग एडवेंचर या डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे एका 36 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या मुलीने गोड बोलून या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर त्याचे तब्बल 90000 रुपये लुबाडले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी एका 36 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार एक तरुणी आणि एका पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सिकिंग एडवेंचर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून फिर्यादी यांची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. या तरुणीने फिर्यादीला स्वतःचे फोटो टेलिग्राम वर पाठवले आणि तुला भेटायचे आहे असे सांगितले. तरुणीच्या प्रतिसादानंतर फिर्यादीने न-हे परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेला.
दरम्यान आरोपी तरुणी फिर्यादी तरुणाने बुक केलेल्या रूमवर आली. काही वेळ तिने फिर्यादी सोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तिने फिर्यादीला बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादीने ते केलेही. त्यानंतर मात्र यात तरुणीची हाव आणखी वाढत गेली आणि तिने 38 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. यावेळी मात्र फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला.
यावर आरोपी तरुणीने हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला आतमध्ये बोलावले. त्या व्यक्तीने आत आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. इतकच नाही तर या दोघांनी फिर्यादीला मारहाण करत त्यांच्या हातातील अंगठी ही काढून घेतली. एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन या दोघांनीही त्या ठिकाणाहून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.