पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअर कंपनीतील चालकासह तिघांचे अपहरण करून, ३१ लाख रुपयांची रोकड लुटणाºया गुजरातमधील टोळीचा गुन्हे शाखेने अवघ्या तीन आठवड्यांतच छडा लावला. यातील दोघांना युनीट एकच्या पथकाने अटक करून, २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या टोळीने अशा प्रकारे दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या ठिकाणीही दरोडे टाकले आहेत.सूरज ऊर्फ सूर्या कनूभाई राठोड ऊर्फ हालपट्टी (वय ३४, रा. दिव दमन), कमलेश बाबूभाई धोडी (वय २६, रा. जि. वलसाड, गुजरात) या दोघांना अटक केली आहे.टोळीचा म्होरक्या अनिल ऊर्फ मामा रामचंद्र आढाव (वय ४२, दिव दमन), पप्पू यादव ऊर्फ बिहारी , नरेश नट्टू गामित (वय ३८, जि. तापी, गुजरात) याच्यासह अन्य तिघांचाशोध सुरू आहे. मनोज ऊर्फ कांतिलाल धनाजीभाई डेंडोरे (वय ३८, रा. रास्ता पेठ) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.डेंडोरे हे राजेश मणिलाल अॅण्ड कुरिअर कंपनीत वाहनचालक म्हणून नोकरीला आहेत. गेल्या महिन्यात गुरुवारी (दि.२४) पहाटे साडेचार वाजता व्यवस्थापकासह ते ३१ लाखांची रोकड घेऊन मुंबईला निघाले होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाजवळील पेट्रोल पंपावर इंधन भरले.तेथून बाहेर पडताच काही अंतरावर त्यांना अंबर दिवा लावलेली गाडी आडवी आली. त्यातील एकाने पोलिसांचा गणवेश घातला होता. त्यांनी पिस्तुलच्या धाकाने त्यांच्या स्कॉर्पीओचा ताबा घेतला. तेथून त्यांना तळेगाव ढमढेरे येथे सोडले. तेथून काही अंतरावर गाडी सोडून देऊन ३१ लाख रूपयांची रोकड लांबविली.युनीट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, युनीट तीनचे पोलिस निरीक्षक सिताराम मोरे, सहाय्यक निरीक्षक बाबर, धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, कर्मचारी पोलिस शिपाई गजानन सोनुने, प्रकाश लोखंडे, इम्रान शेख, सचिन जाधव, मोहन येलपल्ले, अशोक माने, राजू पवार, राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंह वसावे, प्रशांत गायकवाड, मेहबुब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुभाष पिंगळे, सुरेंद्र आढाव, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. युनीट एकचे पोलीस शिपाई गजानन सोनुने यांनी सीसीटीव्ही तपासले असता, त्यांना यातील मुख्य सूत्रधाराची माहिती मिळाली. त्यावरून तपास सुरू केला.सूरज राठोड आणि कमलेश धोंडी रोकड घेऊन फलटण येथे आढावच्या मूळ गावी जात असल्याची माहिती सोनुने यांना मिळाली. त्यावरून चांदणी चौक येथे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ लाख रोकड, दोन एअरगन आणि गाडी असा ३१ लाखांचा ऐवज जप्त केला, अशी माहिती उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
चतु:शृंगी दरोड्यातील दोघांना अटक, तीन आठवड्यांत केली अटक, आणखी सहा जणांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:30 AM