चाकण : गावच्या चावडीवर रोज सकाळ व संध्याकाळ हजेरी लावल्याबिगर गावातील लोकांना राहवत नसे. कारण राजकारणातील गप्पांचा फड, एखाद्याची टिंगलटवाळी, अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा-जत्रातील तमाशाच्या गप्पा, पीकपाण्याविषयी आचारविचार की, गावातील एखादं प्रेमप्रकरण असे एक ना अनेक गप्पांचे फड चावडीवर रात्र-रात्र रंगायचे. चटणी-मीठ लावून त्याचं पार चर्वितचर्वण व्हायच्या चावडीवर रंगलेल्या पत्त्यांच्या डावावर चहा वडापावच्या पार्ट्या किंवा गायछापच्या उग्र वासाबरोबरच विड्यांचे धूर उठायचे, अशी ही चावडी. गावातील शहाणी माणसं, राजकीय पुढारी, मोठी माणसं, म्हातारी-कोतारी ते नव्यानंच मिसरूड फुटलेली तरुण पोरं गप्पात रंगून जायची. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते निकालपर्यंत चावडीवर माणसांचा प्रचंड राबता असायचा. मात्र, सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शहरांसह खेडीही झपाट्याने बदलू लागली. चावडी संस्कृतीला घरघर लागली. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं. सोशल मीडियाच्या उदयानं तर सर्वांच्या जगण्याचे आयामच बदलले. एका क्षणात मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सोशल मीडियामुळे मानवाचं आयुष्यच बदलून गेलं आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकमुळे गावाच्या सतत संपर्कात आली. त्यावरून सकाळ-संध्याकाळ संवाद साधला जाऊ लागला.गावातील चावडी व पार ओस पडू लागले,आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजचे ढिगारे वाढू लागले. ग्रामसंस्कृतीतील चावडीची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. गावागावात सोशल मीडिया भरभरून वाहत असल्याचं अन् चावड्या ओस पडत चालल्याचं विदारक चित्र दिसतंय. परिणामी ग्रामसंस्कृतील चावड्या नष्ट होत चालल्या आहेत. खेड्यातल्या माणसांचं आयुष्य या चावड्यांनी व्यापून टाकलं होतं. हे वैभव आता लयाला, विस्मरणात जात आहे. येणाऱ्या नव्या पिढीला ‘चावडी’हा प्रकार कदाचित चित्र काढूनच दाखवावा लागतो की काय! असे जुने जाणकार भीती व्यक्त करत आहेत.पूर्वीच्या काळी खेडेगावांमध्ये शिक्षण व मनोरंजनांची फारशी साधनं नव्हती. या चावड्यांचं गावाच्या व्यक्तिमत्त्व विकासात फार मोठं योगदान होते. गावातील प्रत्येकाचं या चावडीशी अतूट नातं होतं. निवडणुका जवळ आल्या की, गावात रणधुमाळी सुरू व्हायची.पार, चावडी माणसांच्या गर्दीने पार फुलून जायची. मग रात्र-रात्र राजकीय गप्पांचा फड रंगायचा.
सोशल मीडियाच्या युगात चावडी संस्कृती पावतेय लोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:40 PM
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शहरांसह खेडीही झपाट्याने बदलू लागली. चावडी संस्कृतीला घरघर लागली. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं.
ठळक मुद्देगप्पांचे फड झाले दुर्मिळ : मोबाईलचे युग तरुणांचे आकर्षण : गावाच्या व्यक्तिमत्त्व विकासात फार मोठं योगदान