वडगाव निंबाळकर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
बारामती : बारामती येथील स्वस्त धान्य दुकानाचा काळा बाजार येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. संबंधित दुकानदाराविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत गावकामगार तलाठी भरत संजय वाव्हळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाटे (ता. बारामती) येथील स्वस्त धान्य दुकानदार रामप्रसाद बाबा माने यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास लाटे येथील पोलिस पाटील रुपाली वाघमारे यांनी गावातील रेशन दुकानदार माने हे दुकानातील गव्हाची पोती काळ्याबाजारात विकण्याच्या हेतूने टेम्पोतून (एमएच-१२, एफडी-१८५६) मधून घेऊन जात असून, त्याचे आम्ही चित्रीकरण केले असल्याचे कळविले. ही बाब दुकानदाराच्या निदर्शनास आल्याने त्याने टेम्पोत भरलेली पोती पुन्हा दुकानात ठेवली. वाव्हळ यांनी पणदरे विभागाचे मंडल अधिकारी रवींद्र पारधी यांना ही बाब कळविली. त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी शिरष्णेचे गावकामगार तलाठी दत्तात्रय तलवार व कोऱ्हाळे बुद्रूकचे तलाठी प्रल्हाद वाळुंज यांना पंचनामा करण्यास सांगितले. या दोघांनी तेथे जात दुकानदाराला बोलावले. परंतु दुकान बंद करून ते निघून गेल्याने लाटेच्या सरपंच शीतल अनुराग खलाटे, पोलिस पाटील रुपाली वाघमारे या पंचांना सोबत घेत स्वस्त धान्य दुकान सील केले. त्यानंतर दि. ६ रोजी नायब तहसीलदार महादेव भोसले, वाळुंज यांनी या दुकानाचे सील केलेले कुलुप खोलून पाहणी केली. या वेळी ४८० किलो गहू अधिक आढळून आला, तर ४५४ किलो तांदूळ कमी असल्याचे लक्षात आले. तसेच दुकानदाराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत लावलेली नव्हती. साठा पुस्तक व विक्री पुस्तक अद्ययावत ठेवले नव्हते. गव्हाची २०० किलो वजनाची चार हजार रुपये किमतीची चार पोती काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.