पुणे : गोव्यातील मोपा विमानतळाजवळ असलेली जागा स्वस्तात खरेदी करुन देतो. तसेच खरेदी केलेली जागा जास्त किमतीत विकून जास्त पैसे मिळवून देतो असे सांगून पाच जणांनी पुण्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीची ४ कोटी ३४ लाख १८० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचही आरोपींवर एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळुराम पंढरीनाथ चौधरी (५३, रा. आंबेगाव बु.) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जीवन पोपट मगाडे (३५), सागर दत्तात्रय गोऱ्हे (३२), महेश लक्ष्मण भोसले (३२), विजय अर्जुन कचरे आणि ज्ञानेश्वर महात्माजी पवार (३१) या पाच जणांवर फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी अ`क्ट) ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान मार्केट यार्ड येथील गेट नं. १ च्या पार्किंगमधील कावेरी हॉटेल व उत्सव हॉटेलच्या बिल्डिंग मधील मस्तानी हाऊस येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन चौधरी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना गोवा येथील मोपा विमानतळाजवळ असलेल्या जागेत ८ हजार स्क्वेअर मीटरमध्ये ५०० स्क्वेअर फुट चे १० व्हिला व उर्वरित ३ हजार स्क्वेअर मीटर मोकळी जागा स्वस्तात खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवले. तसेच ही जागा जास्त किमतीत विकून चांगला परतवा देण्याचे देखील आश्वासन दिले. आरोपींनी चौधरी यांना जागा खरेदी करुन देण्याचे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी वेळोवेळी ४ कोटी ३४ लाखांची रक्कम उकळली होती.
त्यानंतर आरोपींनी जमीन तसेच पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चौधरी यांनी परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या परवानगीने मार्केट यार्ड पोलिसांनी पाच जणांवर एमपीआयडी अ`क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.