अजित पवारांनी फसविले; अंगणवाडी सेविकांचा आरोप, जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:59 AM2022-03-19T11:59:39+5:302022-03-19T12:03:51+5:30
अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला
पुणे : अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीसह इतर मागण्या पूर्ण करणार करू, असे आश्वासन दिले होते. मात्र अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता.
महागाई प्रचंड वाढली आहे. चार वर्षांपासून मानधन वाढ नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील स्थगित केलेला मोर्चा पुन्हा काढण्याचा निर्धार करीत अंगणवाडी सेविकांनी परिषदेवर संताप मोर्चा काढला. प्रवेशद्वारासमोर सेविकांनी ठिय्या मांडला होता.
मानधनवाढीसह इतर विविध मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येईल, अशी आशा अंगणवाडी सेविकांना होती. यावेळी अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्राच्या राज्य सचिव शुभा शमीम, पुणे जिल्हा सचिव रजनी पिसाळ, इंदापूर तालुकाध्यक्ष बकुळा शेंडे, अशाबी शेख, सुवर्णा शितोळे, रेखा शितोळे, अनिता कुठे, जयश्री मारणे, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
शुभा शमीन म्हणाल्या, गॅस महाग झाला आहे. सर्वच स्तरांवर महागई वाढली आहे. सरकारने आश्वासन दिले होते मानधनवाढीचे; मात्र ते पाळले नाही. कोरोनाकाळात अंगणवाडी सेविकांनी पुढे येऊन काम केले. त्यांच्या मानधनवाढीचा विचार सरकारने अर्थसंकल्पीय या अधिवेशनात करायला हवा होता. यापूर्वी दिलेल्या मोबाईलमध्ये केंद्राने पोषण ट्रॅक अॅपची भाषा इंग्रजी केली. ती मराठी असणे आवश्यक होते. इंग्रजीत असल्याने महिलांना त्यामध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत.