पुणे : तीन वर्षांच्या हॉलिडे पॅकेजवर डिकाऊंट देण्याचे अमिष दाखवून सभासदांकडून पैसे घेऊन १८ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोलीजर इंटरनॅशनल या कंपनीचे संचालकांनी कार्यालय बंद करुन पळ काढला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद मोरे, आशिष जगताप आणि विशाल भोर अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी संजय राचेल्ली (वय ४३, रा़ जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गोलीजर' इंटरनॅशनल या कंपनीचे सेनापती बापट रोडवरील आयसीसी ट्रेड टॉवरमध्ये कार्यालय आहे. कंपनीचे संचालक व इतरांनी फिर्यादींना तीन वर्षाचे हॉलिडे पॅकेजवर २० हजार रुपये डिस्काऊंट देण्याचे अमिष दाखविले. त्यांना पैसे भरुन सभासद होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्याकडून ७६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणतीही सेवा न देता कोणालाही न कळविता अचानक कार्यालय बंद केले. तसेच पैसे परत करण्यास नकार देऊन फिर्यादीची फसवणूक केली. राचेल्ली यांच्याप्रमाणेच आणखी १७ सभासदांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार केली असून फसवणूक झालेल्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.