पुणे : आठ आलिशान मोटारी घेण्यासाठी मे २०१५ मध्ये साई साक्षी आॅटोमोटिव्ह कार्स प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कडून सव्वा दोन कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र कर्जाची उर्वरित रक्कम न भरता महिंद्राकडे तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत वादवाणी (रा. डी. ४८, वसंत विहार फुलबाग जवळ, लपकर ग्वालीयर) आणि राकेश राजपाल (रा. २६/३ मनोरमा गंज फ्लॅट नं. ५०, रॉयल हाईट्स, इंदोर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. सुधाकर यादव (वय ४१, रा. सावरकरनगर, ठाणे वेस्ट) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई साई साक्षी आॅटोमोटिव्ह कार्स प्रा. लिमिटेडचे संचालक पुनीत वादवाणी व राकेश राजपाल यांनी मे २०१५ मध्ये आठ आलिशान कार घेण्यासाठी फिर्यादी यांच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सव्हिसेस लिमिटेड कडून २ कोटी १५ लाख रूपयांचे कर्ज घेतले. कर्जाची काही रक्कमही भरली. मात्र कर्जाची उरलेली १ कोटी १४ लाख ५१ हजार ७९० रूपयांची रक्कम त्यांनी भरली नाही. महिंद्रा फायनान्सकडे तारण असलेल्या आठ कार फिर्यादीला न दाखविता त्यापैकी एका कारची कंपनीच्या परवानगीशिवाय दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी केली तसेच आठ कारची परस्पर कोठेतरी विल्हेवाट लावून फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोलते पुढील तपास करीत आहेत.
मोटारींची परस्पर नोंदणी करून लाटले सव्वा कोटी; विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 6:40 PM
तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देसाई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसुधाकर यादव (वय ४१) यांनी दिली फिर्याद; मे २०१५ मध्ये घडला होता प्रकार