लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशाच्या सैन्य दलातील एका बड्या अधिका-याशी ओळख आहे. त्यांच्याआधारे नोकरी लावून देण्याचा बहाणा करून तरुणाकडून तीस हजार रुपये घेऊन फसवणूक करणा-या एकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमित अशोक नलावडे (वय 45, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी राम सुरेश उबाळे (वय 24, रा. चिंचगाव, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. नलावडे याने उबाळे यांना भेटून सांगितले की, त्याची सैन्यातील बड्या अधिका-यांबरोबर ओळख आहे. त्या अधिका-याच्या माध्यमातून तुमची सैन्यात भरती करतो. त्यासाठी वेळोवेळी 30 हजार रुपये घेतले. मात्र नोकरी मिळवून दिली नाही. त्याबाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली. त्यानंतर जॉयनिंग लेटर देतो असे सांगून फिर्यादी आणि साक्षीदार यांना सैन्याचे बनावट सहीचे पत्र दिले. त्या मोबदल्यात साक्षीदार यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदार यांना विश्वासात घेऊन फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेठकर यांनी केली होती.