यवत : यवत व परिसरातील शेतमजूर महिलांना पैसे दाम दुप्पट करण्याच्या नावाखाली झारखंड मधील एका खाजगी कंपनीने सुमारे चार कोटी पेक्षा अधिक रुपये जमा करून फसवणूक केली आहे. मागील चार ते पाच वर्षपासून हा प्रकार सुरू असून आता महिलांना दाम दुप्पट परतावा मिळणार नाही असे समजल्यावर सर्व महिलांनी थेट यवत पोलीस ठाणे गाठून त्यांचे गाºहाणे मांडले आहे. परिसरातील वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांवर शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी आपल्या प्रपंचाला हातभार लागेल अशा अपेक्षेने संबंधित योजनेत गुंतवणूक केली होती.
संबंधित खासगी कंपनीने राज्यात अनेक ठिकाणी गुंतवणूक स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले असल्याचे यवत परिसरातील महिलांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात पैसे भरल्यानंतर काही महिलांना व्यवस्थित परतावा देखील देण्यात आला होता. यामुळे इतर महिलांचा विश्वास वाढला आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेल्या जवळपास सर्व महिला शेतमजूर असल्याने रविवारी त्यांनी गावातील स्थानिक नेत्यांना फसवणुकीचा प्रकार सांगितल्यावर त्यांनी यवत येथील भैरवनाथ मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, अरविंद दोरगे, श्रीपती दोरगे, मोहसीन तांबोळी, नामदेव दोरगे, अविनाश अवचट, अशोक दोरगे यांनी फसवणूक झालेल्या महिलांना पोलीस ठाण्यात झाल्या प्रकाराबद्दल तक्रार देण्याबाबत मार्गदर्शन केले. यवत व परिसरातील महिलांचे म्हणणे ऐकले असून फसवणूक प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती घेऊन पोलीस कारवाई करतील. मात्र आर्थिक दृष्या फसवणुकीचे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत.फसवणूक करणाºया खाजगी कंपनीने आमिष दाखविणाºया विविध योजना महिलांसमोर मांडल्या होत्या. एक रकमी लाख रुपयांचे पेक्षा जादा रक्कम भरल्यास पाच वर्षांत दुप्पट पैसे मिळणार तर दररोज पैसे भरण्याची योजना देखील आखण्यात आली होती. सर्वसामान्य महिलांना सावज बनवत स्थानिक महिला एजंटच्या मदतीने ही रक्कम गोळ्या करण्यात आले आहेत.