पुणे : ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने तामिळनाडूतील महिलेला ४० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, हा प्रकार मे २०१६ ते २९ सप्टेंबर २०१६ या कालावधीदरम्यान घडला. पवन पांडे, हर्षवर्धन, शैलेशकुमार सिंग, अभिनव वर्मा (पूर्ण नाव व पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामलक्ष्मी ई. (वय ४०, रा. तमिळनाडू) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या चेन्नईच्या असलेल्या रामलक्ष्मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये असतात. त्यांच्या मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश हवा होता. त्याने नीटची परीक्षा दिली होती. पांडे आणि त्याच्या साथीदारांनी विमाननगर भागात कार्यालय थाटले होते. (प्रतिनिधी)४‘ड्रीम्स वे नॉलेज अँड सर्व्हिसेस’ या नावाने थाटलेल्या कार्यालयामधून आरोपींनी मे २०१६ मध्ये रामलक्ष्मी यांना मेसेज पाठविला. त्यांच्या मुलाला राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांची बंगेलोर, चेन्नई येथे भेट घेत टप्प्या-टप्प्याने त्यांच्याकडून ४० लाख रुपये उकळले. कर्नाटकातील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देऊ असे सांगत त्यांची फसवणूक केली. पुढील तपास उपनिरीक्षक सुप्रिया माने करत आहेत.
प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: October 10, 2016 1:57 AM