राजगुरुनगर: यंदाच्या हंगामात पोषक हवामानामुळे कांदा उत्पादन उत्पादन वाढले. भाव वाढल्याने शेतकरीही समाधानी आहेत. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा खरेदीत फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कांदा विक्री करताना अधिकृत संस्था अथवा व्यक्तींना कांदा विकून फसवणूक टाळणे गरजेचे आहे. परप्रांतीय अनेक व्यापारी उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा खरेदीत सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसंदर्भात काळजी घेतल्यास संभाव्य आर्थिक फसवणूक टळू शकते.उत्तर पुणे जिल्ह्यात पोषक थंडी आणि निरोगी वातावरणाने कांदा चांगला पोसला आहे. त्यामुळे प्रति एकरी उत्पादन वाढले आहे. मार्च सुरू झाल्यापासून या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. हा कांदा काढून झाला असून शेतकरी विक्रीस आणीत आहेत. काही शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कांदा चाळीत हा कांदा साठवत आहेत.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करण्याकडे काही व्यापाऱ्यांचा कल आहे. यात परप्रांतीय व्यापारी अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा काही व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून शेतकऱ्यांना फसविल्याच्या घटना घडल्या आहेत. जास्त भावाचे अमिष दाखवून, काही रक्कम आगाऊ देऊन कांदा खरेदी केला जातो. त्यानंतर तो व्यापारी पुन्हा फिरकत नाही. शेतकऱ्यांचे पैसे अशावेळी बुडतात.अवतीभोवती घडणाऱ्या या घटनांचा अनुभव पहाता शेतकऱ्यांनी अधिकृत खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था तसेच बाजार समित्यांचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
मध्यस्थीतर्फे एका कांदा व्यापाऱ्यास कांदा दिला. दर ठरला त्यावेळी आगाऊ रक्कम दिली. तीन दिवसांनी हा माल उचलण्यात आला. दोन दिवसात पैसे देण्याचे आश्वासन असताना हा हिंदी भाषिक व्यापारी पुन्हा फिरकला नाही. मध्यस्थांकडून आज उद्या अशी चालढकल सुरू आहे.- देवा ढगे , कांदा उत्पादक शेतकरी...........परप्रांतीय व्यापारी फसवणूक करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी माहितीगार व्यापाऱ्यांना माल देऊन फसवणूक टाळावी. कांद्याचा सध्याचा भाव तेजीत असला तरी वळवाचा पाऊस, येऊ घातलेला मान्सून या पार्श्वभूमीवर काही दिवसात भाव कमी होण्याचा अंदाज आहे. -संकेत वर्पे, कांदा व्यापारी