पुणे : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची महापालिका निवडणुकीत पुण्यामध्ये प्रथमच आघाडी होत आहे. या आघाडीमागे दोन्ही काँग्रेसचा एक विचार होता. ते सत्ता आणण्याचा नाही तर जातीयवादी, धर्मवादी अशा विचारांना रोखण्याचा. त्यात भाजपा-शिवसेना यांची युती तुटलेली. त्यामुळे त्यांची मते विभागणार हे दिसत असताना त्याच पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी यांनीही लढणे चुकीचे होते. त्यामुळे विचारांवर केली गेलेली ही आघाडी निवडणुकीत नक्की यश मिळवणार, यात मला तरी शंका नाही.काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. ती आता नाहीत असे म्हटले जाते. माझा त्यावर विश्वास नाही. आमची मते कायम आहेत. उलट त्यात आता वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांतील भाजपाच्या हालचाली पाहिल्या तर सत्तेसाठी काहीही असे त्यांचे सुरू आहे. निवडून येण्याचा निकष म्हणजे त्या व्यक्तीची त्या भागातील दहशत असे नसते. ते समजत नसल्यासारखे त्यांनी अनेकांना पक्षात प्रवेश दिला आहे. पुणेकरांनाच काय पण त्यांचा म्हणून जो कमिटेड मतदार आहे त्यांनाही ते आवडणार नाही, असा माझा अंदाज आहे.दुसरे म्हणजे राज्यात, केंद्रात सत्ता असताना भाजपाने पुण्यासाठी केले तरी काय, असा माझा प्रश्न आहे. मेट्रो हा काँग्रेसचा प्रस्ताव होता. त्याला चांगली गतीही आम्हीच दिली. रिंगरोडचा विषय बासनात गेला होता. तो मी विधानसभेत प्रश्न विचारून अजेंड्यावर आणला. पुण्यातील कोणते प्रश्न भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत उपस्थित केले ते त्यांनी जाहीरपणे सांगावे. त्यांच्या पक्षातील काही जणांच्या वैयक्तिक फायद्याच्या असलेल्या स्मार्ट सिटी, २४ तास पाणी यांसारख्या योजनांना महापालिकेत विरोधात असतानाही भाजपाने राष्ट्रवादीला साथ दिली, हेच काय ते सांगू शकतील.विकास म्हणजे इमारतींचे जंगल उभे करणे असा काही तरी भाजपाचा गैरसमज झालेला दिसतो आहे. सर्वसामान्यांना जगणे आनंददायी होईल अशी कामे म्हणजे विकास. त्यात सार्वजनिक सुविधांची गुणवत्ता सुधारणे, त्याची आधुनिक जगाशी सांगड घालणे, वाढलेल्या वसाहतींना नागरी सुविधा कशा पुरवता येतील, याचा विचार करणे म्हणजे विकास, युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शहरात उद्योग, व्यवसाय आणणे, गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. केंद्रात व राज्यात सत्ता असताना भाजपाकडून असे काहीही केले गेल्याचे दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्याला मेट्रो नको असे माझे एक पुणेकर म्हणून त्याहीपेक्षा एक आर्किटेक्ट म्हणून स्पष्ट मत आहे. योजना आता मान्य झाल्यावर आम्ही मेट्रो स्वीकारली. पण आता भाजपा त्यात काय करत आहे, ते आम्ही पुणेकरांसमोर आणणार आहोत. पुण्यासाठी १०० कोटी व नागपूरसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद हा काय प्रकार आहे.? नागपूरचे काम सुरू व पुण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यास २ वर्षांचा विलंब. आताही फक्त मान्यता मिळाली आहे.
भाजपाकडून पुणेकरांची फसवणूक
By admin | Published: February 16, 2017 3:32 AM