लोकमत न्यूज नेटवर्कचतु:शृंगी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही जणांची फसवणूक केल्याप्रकरणी विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य एकावर गुन्हा नोंदवून चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दत्तात्रय रामचंद्र मोरे आणि विजय रघुनाथ मोरे (नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. दिलीप अनुसे (मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी याबाबत फिर्याद केली आहे. मे २०१४ पासून आजपर्यंत हा प्रकार झाला.अनुसे हे सेवानिवृत्त जवान आहेत. दत्तात्रय मोरे हा सेवक वसाहतीमध्ये राहत होता. तो विद्यापीठामध्ये सेवेस होता. विजय मोरे हा शिपाई असून दत्तात्रयचा भाऊ आहे.एकाने दत्तात्रय मोरे याच्याशी अनुसे यांची ओळख करून दिल्यानंतर दत्तात्रय मोरे याने क्लार्क पदासाठी भरती होणार असल्याची थाप त्यांना मारली. आपली अधिकाऱ्यांशी ओळख आहे, असे सांगून त्याने अनुसे यांच्या मोठ्या व लहान मुलाला व सुनेला क्लार्कची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडून अनुसे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पैसे देण्यास तयार झाल्यानंतर अनुसे यांच्याकडून सुरुवातीला अॅडव्हान्स म्हणून २ लाख ७० हजार रुपये देण्याची मागणी केली. नंतर १ लाख आणि तिसऱ्यांदा दीड लाख रुपये घेतले. असे एकूण मिळून ४ लाख ८० हजार रुपये घेण्यात आले. राजभवन येथे शैक्षणिक कागदापत्रांची पडताळणी करण्यासाठी मोरे याने पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळी एका अधिकाऱ्यांशी बोलणे करून देण्याच्या बहाण्याने त्याने विजय मोरे या आपल्या भावास फोन लावून दिला. त्यानेही आपण प्रशासकीय अधिकारी बोलत असल्याचे खोटे सांगून फसवणूक केली.अनेक महिने नोकरी न लावल्याने अनुसे यांनी मोरे याला अनेकदा विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. अनुसे यांनी कागदपत्रे मागितली असता मोरे याने पैसे परत करण्याच्या निमित्ताने चेक दिले. ते न वटल्याने अनुसे यांनी त्याला जाब विचारला, त्यावेळी फसवणूक लक्षात आली. मोरे नंतर ६ महिने अनुसे यांना भेटला नाही. दरम्यान, त्याने घेतलेल्या रकमेपैकी १ लाख ५३ हजार रुपये परत दिले. अनुसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. यावेळी तसेच निखिल राम लोखंडे (वय २७, अशोकनगर, भोसरी) यांच्यासह इतरांचीही आरोपींनी फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक निरिक्षक संदेश केंजळे तपास करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:14 AM