पुणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पर्ल्स (पीएसीएल) इंडिया लिमिटेड कंपनीच्या ९ संचालकांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पर्ल्स कंपनीने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.कंपनीचे संचालक आनंद गरुवंतसिंग, तारलोचनसिंग, सुखदेवसिंग, निर्मलसिंग भांगू, गुरनामसिंग, उपल देवेंद्र कुमार, टायगर जोगींद्र, गुरमीतसिंग व सुब्रता भट्टाचार्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विशाल विनायक सुर्वे (वय ३३, रा. नागपूरचाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे जंगली महाराज रस्त्यावरच्या भोसले शिंदे आर्केडमध्ये कार्यालय आहे. कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी सुर्वे यांना दाखविले होते. त्यांच्याकडून सलग ५ वर्षे प्रतिवर्षी १५ हजार रुपयांप्रमाणे गुंतवणूक करवून घेतली. त्यांना १,८०० यार्ड जमीन दिल्याचे दाखविण्यात आले. मुळात ही जमीन त्यांना कधी दाखविण्यात आली नाही. तसेच या जागेवर शेती किंवा अन्य विकासकामे झाल्याचेही कधी त्यांना सांगण्यात आले नाही. आरोपींनी सुर्वेंप्रमाणेच सुर्वे यांच्यासह कुलदीप शिंदे (भिवडी), मारुती शिवराम शिंदे, सुषमा संजय जाधव (केसनंद), मनीषा रोहिदास राऊत (राऊतवाडी), इंद्रजित रावत पुंड (रा. येरवडा), शालन प्रकाश बनकर (रा. चिंबळी), समीर बाळासाहेब जगताप (रा. मांडकी), वनिता रामभाऊ नरुटे (रा. लोहगाव), सुरेखा नवनाथ कांबळे (रा. वैदवाडी), मनीषा साहीदास राजगुरू (रा. धनकवडी), शिल्पा शंकर भंडारी (रा. कोथरुड) यांचीही फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रमेश मोरे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Published: November 26, 2015 1:05 AM