पुणे : ट्रेडिंग वेबसाइटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल, असे सांगून एका पोलीस हवालदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनोळखी मोबाइल क्रमांक आणि व्हाट्सअपद्वारे संपर्क करून ही फसवणूक केली आहे. हा प्रकार २५ मे २०२३ ते १८ ऑगस्ट २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असे आमिष दाखवून तक्रारदार यांना व्हाट्सअँप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देऊन बनावट वेबसाईटच्या आधारे नफा मिळाल्याचे दाखवून तक्रारदार यांना पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडील एकूण ३२ लाख २२ हजार किमतीचे बिटकॉइन्स घेतले.
पत्नीचे दागिने ठेवले होते गहाण-
प्रत्यक्षात पैसे विड्रॉल करण्यासाठी गेले असता ते होत नसल्याने त्याबाबत विचारणा केली मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील करत आहेत. बिटकॉइनमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादींनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले होते. तसेच पत्नीचे दागिनेसुद्धा गहाण ठेवून त्याचे आलेले पैसे ट्रेडिंगमध्ये लावले होते.