नारायणगाव : जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतील टोमॅटो उत्पादकांना सिजेंटा कंपनीच्या १०५७ या जातीच्या सदोष बियाण्याची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी ३७ शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात आणि तालुका कृषी विभागाकडे कंपनीविरोधात तक्रार केली आहे. या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी, कृषी विभागाकडून माहिती घेऊन कारवाईचे आश्वासन दिले.नारायणगाव, येडगाव, हिवरे, आर्वी, कळंब, पिंपळगाव, जुन्नर आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जुन्नर व आंबेगाव हे तालुके राज्यात अग्रेसर आहेत. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून टोमॅटो पिकावर तिरंगा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. हा रोग फक्त सिजेंटा कंपनीच्या १०५७ या जातीवर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ६ एप्रिलला तालुक्यातील टोमॅटो बागांना भेटी देऊन पिकांची पाहणी केली. कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीहरी हसबनीस, डॉ. क्षीरसागर, कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ज्ञ संतोष सहाणे या शास्त्रज्ञांना सिजेंटा कंपनीच्या १०५७ या जातीच्या बियाणात दोष आढळला. ३७ शेतकऱ्यांनी अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज दिला आहे.
जुन्नरमधील टोमॅटो उत्पादकांची फसवणूक
By admin | Published: April 10, 2016 4:09 AM