पुणे : कंपनीमध्ये नोकरीसाठी गेेलेल्या तरुणीकडून दहा हजार रुपये घेतल्यानंतरही नोकरी न देता उलट तिलाच बनावट तरुणीच्या नावे फेसबुक खाते उघडून देत त्यावरून कंपनीची जाहिरात करायला लावून फसवणूक केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याने याप्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याची दाट शक्यता असून, फसवणूक झालेल्यांनी वारजे पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन करण्यात आले आहे.
अभिजित अर्जुन सुतार (वय २५, रा. देशमुखवाडी, शिवणे, मूळ रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह इतर साथीदारांविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने फिर्याद दिली आहे. शिवणेतील दांगट इस्टेट लाईमलाईट ट्रेन्डस प्रा. लिमिटेड या कंपनीत दि.८ ते२२ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. दरम्यान, या आरोपींविरोधात अशाप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करणे तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करायची आहेे. आरोपींनी अशाप्रकारे इतर मुलींची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास करायचा असल्याने अटक आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
------------------------------