पुणे : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले हजारो रुग्ण आजमितीला होम आयासोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) आहेत़ यापैकी अनेकांची प्रकृती ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने अचानक चिंताजनक बनते़ यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधितांनी दिवसातून चार वेळा तरी आपली ऑक्सिजन पातळी तपासणे आवश्यक असून, त्याची नोंद ठेवून आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याची माहिती देऊन आपली प्रकृती गंभीर होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर किंवा डिजिटल घड्याळ या माध्यमातून आपण आपली ऑक्सिजन पातळी घरच्या घरी सहज तपासू शकतो़ विशेषत: ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांनी तर ही तपासणी करणे अत्यावश्यक आहे़ दररोज सहा मिनिटे चालून ही तपासणी करता येऊ शकते़ यात चालण्यापूर्वी आपली ऑक्सिजन पातळीही ९६ ते ९७ टक्के असेल व सहा मिनिटे चालल्यानंतरही ही ऑक्सिजन पातळी जर ९३ टक्क्यांपेक्षा कमी झाली नाही तर संबंधित रुग्णाने चिंतामुक्त राहणे शक्य आहे़ परंतु, घरच्या घरी करता येणारी ही चाचणी संबंधित रुग्णाने दररोज दिवसातून चार वेळा तरी करून त्याची नोंद ठेवावी़ तसेच याचवेळी डॉक्टरांनी दिलेला औषोधपचारही नियमित घेणे आवश्यक आहे़
-------------------
चौकट १
९३ पेक्षा ऑक्सिजन कमी आल्यास घ्या काळजी
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधिताची चालण्यापूर्वी ऑक्सिजन पातळी ही ९६ ते ९७ असेल व सहा मिनिटाच्या चालण्यानंतर धाप लागणे, खोकला वाढणे आदी प्रकार होऊन ऑक्सिजन पातळी जर ९३ पेक्षा कमी झाली असेल तर, संबंधित रुग्णाने तातडीने डॉक्टारांना याबाबत कल्पना देऊन पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे़
---------------------
थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर उपयुक्त
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी थर्मामीटर, पल्स आॅक्सिमीटरव्दारे आपली नियमित तपासणी करावी़ या दोन्ही गोष्टी सहज मेडिकलमध्ये उपलब्ध असून, यातून आपल्याला आपल्या प्रकृतीतील बदल सातत्याने कळत राहिल्याने जागृत राहणे शक्य होते़
------------------
--------------------------
होम आयसोलेशमधील रुग्णांचे शहरात प्रमाण मोठे आहे़ यापैकी काही जणांची प्रकृती अचानक ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने खालावते़ यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधितांनी दिवसातून चार वेळा तरी आपल्या शरीरामधील ऑक्सिजन पातळी तपासावी़ सहा मिनिटे चालण्यापूर्वी व चालल्यानंतर जर ऑक्सिजन पातळी ही ९३ पेक्षा कमी येत असेल तर, लागलीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा़ सातत्याने ऑक्सिजन पातळी कमी होणे हे धोकादायक आहे.
-डॉ़ अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
----------------------------