पुणे : अयोध्येतील ऐतिहासिक अभिषेक सोहळ्यासाठी जागतिक विक्रमधारक विष्णू मनोहर ७ हजार किलोचा ‘राम हलवा’ तयार करणार आहेत. हा हलवा तयार करण्यासाठी सुमारे तीन तास लागणार असून, श्री राम मंदिर ट्रस्ट ‘राम हलव्या’च्या साहित्यासाठी आणि कढईसाठी पैसे देणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली. ‘कर सेवा से पाक सेवा’ संकल्पनेतून हा हलवा बनविण्यात येणार आहे. “मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आधुनिक स्वयंचलित पर्याय उपलब्ध असले तरी, हा एक विशेष धार्मिक प्रसंग आहे, म्हणून आम्ही सर्व कामे हाताने करू,” असे विष्णू मनोहर यांनी आवर्जून नमूद केले.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा हलवा बनविण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर हलव्याचा भोग प्रभू रामाला अर्पण करण्यात येणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक अभिषेक सोहळा आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या दीड लाख भाविकांना आणि इतर व्हीआयपींमध्ये ‘राम हलवा’ वितरित केला जाणार आहे.
राम हलवा शिजविण्यासाठी विशेष ‘कढई’
राम हलवा शिजविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी नागपुरात सुमारे १३०० ते १४०० किलो वजनाची स्टीलची विशेष कढई तयार केली आहे. या कढईचा व्यास १५ फूट असून, खोली ५ फूट इतकी आहे. हलवा शिजविताना तो जळू नये यासाठी स्टीलच्या कढईचा मध्यभाग लोखंडाचा बनविलेला आहे. तसेच हलवा ढवळण्यासाठी १२ फूट लांबीचा मोठ्ठा कलथा वापरतील.