पुणे :रेल्वे गाड्यांमध्ये घुसून प्रवाशांचा मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून ८ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली. ही कारवाई म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस गाडीमध्ये केली.
विशाल विठ्ठल नागटिळक-देशमुख (३०, रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बलविंदर सिंह मरवा (४४, रा. सम्राटनगर, अहमदाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नई एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक २ मधून प्रवास करत होते. लोणावळा ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान त्यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. या पर्समध्ये ८ लाख ७७ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मरवा यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरील ५२ सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी दोन संशयितांचे फुटेज पोलिसांना मिळाले. सीसीटीव्हीत आढळून आलेले संशयित ओळखीचे वाटल्याने त्या वर्णनाच्या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. यासाठी पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर सापळा लावला. चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी आरोपी रेल्वे स्थानकावर आला. तो म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसच्या जनरल डब्ब्यात जाऊन बसला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करुन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे चोरीचे दागिने व रोख आढळून आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सहायक फौजदार निशिकांत राऊत, सुनील माने, पोलिस हवालदार अमरदीप साळुंके, इम्तियाज अवटी, जावेद शेख, फिरोज शेख, अमोल शेळके, चालक दिलीप खोत आणि राम येवतीकर यांच्या पथकाने केली.