पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही; पण विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. तुपे आणि टिंगरे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. त्यात महायुतीतील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात पुणे शहरातील चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. यावेळी तुपे आणि टिंगरे यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. अशातच एकनाथ शिंदे गटाचे प्रमोद नाना भानगिरे यांनीसुद्धा हडपसर मधून उमेदवारी मागितली आहे. तर वडगाव शेरीमधून महायुतीत रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. भाजपकडून जगदीश मुळीक यांनी उमेदवारी मागितली आहे. पण हि जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा असल्याने सुनील टिंगरेंना तिकीट मिळण्याचे चान्सेस वाढले आहे. तरीही अजित पवार गटाची यादी जाहीर होईपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे.