पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड झाली. राष्ट्रवादीतर्फे आज राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात पुण्यासाठी अनेक दिवस चर्चेत असलेल्या तुपे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्यापूर्वीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा राज्य सभेवर नियुक्ती झाल्यावर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहरध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका याच अध्यक्षाच्या कार्यकालात होणार असल्याने संपूर्ण शहराचे या निवडीकडे लक्ष लागून होते. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूत्रे हातात घेतल्यावर इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करू असे जाहीर केले होते. दरम्यान पावसाळी अधिवेशनामुळे निवडी पुन्हा लांबणीवर पडल्या होत्या. अखेर तुपे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली आहे.
तुपे यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील विठ्ठल तुपे यांनी लोकसभेत पुण्याचे नेतृत्व केले आहे. तुपे हे तिसऱ्यांदा हडपसर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले असून यंदा राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून महापालिकेत भूमिका सांभाळतात. त्यांनी २०१४साली हडपसर विधानसभा निवडणूक लढवली असून त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.आगामी काळात पक्षातील सर्व गटांना एकत्र घेऊन काम करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.