पुणे: पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारी रोजी या पुतळ्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
छगन भुजबळ म्हणाले, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव दिले आहे. या विद्यापीठाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले असे अनेक पुतळे आहेत. परंतु नेमका सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाईंचा पुतळा असावा यासाठी विद्यापीठ आणि सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पुतळा बनवण्यासाठी टाकला आहे. तो लवकरच तयार होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारी रोजी या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी असं पुतळा कमिटीच्या सदस्यांचं मत आहे.
विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर हा पुतळा कुठे बसवावा हे ठरवले जाईल असेही भुजबळ म्हणाले.