पुणे - राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वतः भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीदेखील माध्यमांतून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जातात. आमचे फारच 'जवळ'चे, विरोधक आणि आमचा फार विचार करणाऱ्यांनी या बातम्या पिकवल्या आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.
पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काही वेळा थांबावे लागते, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भिडेवाडा स्मारकाची पाहणी केल्यानंतर ते म्हणाले, 'माझी खासदार होण्याची इच्छा आहेच. विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमांतून पेरत आहेत. मला खासदारकीची संधी दिली नाही, त्याचा अर्थ मी नाराज आहे असा नाही.'