पुणे : मराठ्यांचे आरक्षण अडविण्यात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत भुजबळ यांचा समावेश असतानाही बाहेर येऊन ते यूटर्न घेतात, असा आरोपी त्यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणासंदर्भात राठोड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, “सध्याच्या मराठा व ओबीसी समाजातील आंदोलनाचे भुजबळ हेच आता केंद्रबिंदू असून, मराठा आरक्षणाला विरोध करणे त्यांच्या अंगलट येईल. त्यामुळे भुजबळ यांनी आता राजीनामा देऊन घरी बसावे. भुजबळ यांनी पाठिंबा दिल्यास मराठा आरक्षणाचा तिढा आठ दिवसांत सुटेल. ओबीसीमधूनच हे आरक्षण देणे शक्य असून, मराठा, कुणबी व लेवा पाटील यांना स्वतंत्र, माळी- तेली-भंडारी व आगरी यांना वेगळा भाग व बारा बलुतेदारांना वेगळा भाग असा फॉर्म्युला राज्य सरकारने स्वीकारल्यास सर्वांनाच आरक्षण मिळू शकते. राजकीय आरक्षणासंदर्भातही हाच फॉर्म्युला लागू करणे शक्य असून, त्यातून सर्वांना प्रतिनिधित्व मिळू शकते.”
सरसकट सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, याला विरोध दर्शवितानाच मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भुजबळ हे आमचे नेते असले, तरी त्यांनी आता राजीनामा देऊन मैदानात उतरावे. आरक्षणाला विरोध करून त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असल्याचा दावाही केला. आरक्षणाच्या आंदोलनात त्यांनी उडी घ्यायला नको होती, असा सल्लाही राठोड यांनी यावेळी दिला. राज्य सरकारने मी सांगितलेला फॉर्म्युला स्वीकारल्यास आरक्षण देणे शक्य आहे. त्यासाठी मी सरकारशी चर्चा करण्यासही तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला चर्चेला बोलवावे, असेही ते यावेळी म्हणाले.