- लक्ष्मण मोरे-
पुणे : श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजतेयदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज छत्रपते: यद्त्रोपरिलेखितंअशी स्वकर्तृत्वाला साजेशी राजमुद्रा धारण करणाऱ्या राजकारण धुरंधर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे काम पूर्ण झाले असून जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये हे शिल्प बसविले जाणार आहे. असामान्य शौर्य गाजविणाऱ्या संभाजी महाराजांच्या मनाचा एक हळवा कोपरा काव्याने भारलेला होता. राजकारणावरील बुधभूषण ग्रंथ आजही त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाची साक्ष देतो आहे. संभाजी महाराजांच्या शौर्यासह त्यांच्यातील कवीचे दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांना होणार आहे. महापालिकेच्यावतीने संभाजी उद्यानामध्ये नुकतीच ऐतिहासिक धाटणीची दगडी कमान बांधण्यात आलेली आहे. या कमानीवर छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा कोरण्यात आलेली आहे. तसेच चार हत्तींना पायाखाली तसेच एका हत्तीला शेपटीमध्ये जखडून ठेवलेल्या सिंहाची प्रतिकृती कोरण्यात आलेली आहे. पाच पातशाह्यांना आपल्या अधिपत्याखाली ठेवणारी मराठेशाही असा त्याचा अर्थ आहे. याच कमानीमधून आत गेल्यानंतर उद्यानामध्ये पुतळ्याच्या बारा फुट उंचीच्या चौथऱ्याचे काम सुरु आहे. याठिकाणी संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक उभे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. विधान परिषद आमदार निधीमधून या स्मारकाची उभारणी केली जात असून याठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असेच शिल्प बसविण्यात येणार आहे. अत्यंत सुबक आणि देखण्या असलेल्या शिल्पाची अनेक वैशिष्ट्ये असून तब्बल दोन टन ब्रॉंझ यासाठी लागले आहे. संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. यासोबतच त्यांनी सक्षम केलेले गुप्तहेर खाते, स्वराजासाठी घेतलेले कठोर निर्णय, राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य असे म्हणत शिवाजी महाराजांपश्चात सर्वांना सोबत घेऊन राज्यकारभार हाकण्याची हातोटी, त्यांचे राजकीय आणि आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. एकाच वेळी पोर्तुगिज, सिद्दी आणि मुघलांशी धैयार्ने आणि शौयार्ने लढा देणारे संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. यासर्वांत अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे त्यांची काव्य प्रतिभा. संभाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वातील हे कलात्मक अंग स्मारकाच्या निमित्ताने समाजासमोर येणार आहे. संभाजी महाराजांनी अत्यंत कमी वयामध्ये राज्यनितीशास्त्रपर ह्यबुधभूषणह्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये राज्यनिती, राज्य व्यवस्था, कर्तव्य, मंत्रीमंडळ आदी प्रकरणे आहेत. ग्रंथाच्या सुरुवातीलाच आजोबा शहाजी राजे व वडील छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आणि अलंकारीक अशी स्तुती आहे.=====छत्रपती संभाजी उद्यानामध्ये बारा फूट उंचीच्या चौथºयाचे काम सुरु आहे. या चौथऱ्याच्याभोवती बुधभूषण ग्रंथातील श्लोक असलेली शिल्पही उभारण्यात येणार आहेत. यासोबतच बुधभूषण ग्रंथाचे श्रवण करण्यासाठी ऑडिओ सिस्टीमसह हेडफोन्सचीही व्यवस्था केली जाणार आहे. ====संभाजी महाराजांचे शिल्प साकारताना हे शिल्प देखणे आणि प्रमाणबद्ध कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यांची देहयष्टी आणि बांधा मजबूत होता तो तसाच दाखविण्यात आला आहे. व्याघ्रचर्मावर बसून बुधभूषणचे लिखाण करताना समशेर हाताशी ठेवलेली आहे. त्यांचा पेहराव, अंगावरील आभुषणे, जिरेटोप याकडे बारकाईने लक्ष देण्यात आलेले आहे. ====बुधभूषण लिहितानाचेच शिल्प का साकारले?उद्यानापासून जवळच असलेल्या डेक्कनच्या गरवारे पुलावर छत्रपती संभाजी महाराजांचा हातामध्ये समशेर असलेला उभे शिल्प आहे. शौर्य, आवेश आणि धिरोदात्तपणाचा अनुभव या शिल्पामधून येतो. अगदी एक किलोमीटरच्या आत त्याच पद्धतीचे वीरश्रीयुक्त शिल्प उभारण्याऐवजी संभाजी राजांच्या व्यक्तीमत्वातला बौद्धिक, ज्ञानवंत पैलू व्यक्त करण्यात आला आहे.