पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नाराज मराठा समाजाने शनिवारी उपोषणास प्रारंभ केला होता. या उपोषणात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही सहभाग घेतला होता . मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून सारथीची स्वायत्तता कायम राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'सारथी संस्थेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे मराठा समाजाच्या युवकांनी आणि मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हते तर शनिवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह विद्यार्थी उपोषणाला बसले होते. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी बातचीत केली. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि सरकारतर्फे उपोषणग्रस्तांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले.
यावेळी शिंदे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- सारथीची स्वायत्तता कायम राहणार
- या प्रकरणातून ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांना बाजूला करत आहोत.
-व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांचा राजीनामा सरकार स्वीकारणार नाही.
- सारथीच्या पुढील वाटचालीसाठीच्या निर्णय प्रक्रियेत छत्रपती संभाजीराजे यांना सहभागी करून घेणार.