छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड केली जात आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही करायचे? इतिहासाची तोडफोड चित्रपट काढाल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. मी मवाळ, तसाच कडकही आहे, असा इशारा श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट निर्मात्यांना दिला.
मी छत्रपती घराण्यात जन्माला आलोय, त्यामुळे इतिहासाची तोडफोड करणाऱ्या चित्रपटांविरोधात मीच आडवा येणार. असे अजिबात खपवून घेणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करीन, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना काही बाबी पूर्वनियोजित कटातून होत असल्याचेही दिसून येत आहे. त्याविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती करून यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे यांनी यावेळी छत्रपती उदयनराजे यांच्याबाबतही भाष्य केलं. मी आणि उदयनराजे आम्ही दोघेही अशा गोष्टीविरोधात आहोत. दोघांचे ट्युनिंग चांगले आहे. त्यांचे मत मला मान्य असते आणि माझे मत त्यांना. या विषयावर आम्ही दोघेही कट्टर आहोत, असं संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच ऐतिहासिक चित्रपट काढताना इतिहास अभ्यासकांचे एक मंडळ असायला हवे, जे असे चित्रपट तयार करताना मार्गदर्शन करतील. राज्य सरकारने ते करावे, अशी माझी मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक चित्रपटात काहीही दाखवले. जाते. आता वेडात मराठे वीर दौडले सात नावाचा चित्रपट येत आहे. त्यातील मावळ्यांनी कसली वेशभूषा केलीय. असले मावळे होते का? त्यांना काय मावळे म्हणायचे का? या चित्रपटातील सात जणांपैकी वीरांची नावेच बदलली आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. या चित्रपटाच्या अगोदर आमची नावे टाकली आहेत की, आमचा पाठिंबा आहे. परंतु, आम्हाला त्याविषयी माहितच नाही. मी त्याविरोधात कारवाई करायला लावणार आहे. असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
मराठी लोक हा शब्दच नव्हता-
अलीकडच्या काळात मराठा शब्दाऐवजी जाणिवपूर्वक मराठी या शब्दाचा भर दिला जातो. शिवकाळात मराठी लोक हा शब्दच नव्हता. मराठा साम्राज्य आहे, ते शब्द कशाला बदलताय हेतुपुरस्सर चुकीचा शब्द प्रचलित केला जातोय, त्याला आमचा विरोध आहे. लोकांना आवडते म्हणून काहीही करायचे का? असेही संभाजीराजे म्हणाले.