लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : महाराष्ट्रातील बहुजन बांधवांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे यांनी गुरुवारी देवदर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. दर्शनानंतर त्यांनी येथील मानाची खंडा तलवारही उचलली.
खासदार युवराज संभाजीराजे यांचे दुपारच्या सुमारास सपत्नीक जेजुरी गडावर आगमन झाले. गुरुवारी त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता. लग्नानंतर ते प्रथमच जेजुरी गडावर आले होते. श्रींची माध्यान्ह पूजा-अभिषेक त्यांच्या हस्ते करण्यात आला. कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रमही त्यांनी केले. या वेळी त्यांचेसमवेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, विक्रम शिंदे, सागर जगताप, संतोष हगवणे, आनंद जंगम, संतोष बयास आदी मान्यवर उपस्थित होते. कुलधर्म -कुलाचार व तळीभंडार केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. देव संस्थानकडून त्यांनी गडावरील विविध विकासकामे,येथील ऐतिहासिक घटना आणि सध्या गडाच्या पायरीमार्गावर साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
फोटो : खासदार युवराज संभाजीराजे सपत्नीक खंडेरायाची पूजा करताना.