पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, याबरोबरच मुस्लिम संघटनांनी या पुणे बंदला पाठिंबा दिला असून ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
"छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान मैदान में" अशी घोषणाबाजी करत मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही. त्यांच्या महाराजांच्या सन्मानार्थ आम्ही या मोर्चात सहभागी झाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एक संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने महाराजांबद्दल अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. अशा माणसाची राज्यपाल या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. आम्ही जात - पात धर्म या कोणत्याही गोष्टीचा विचार ना करता फक्त शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या मोर्चात सहभागी झालो आहोत. शिवप्रेमी सर्वधर्मीय पुणेकर म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत.
मोर्चामध्ये लहानग्यांचा सहभाग
पुणे बंदमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार आहे. महिलांबरोबरच लहान मुलेही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील संस्कृतीच्या वारसा जपणाऱ्या वेशभूषा या लंग्यानी प्रदान केल्या आहेत.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
पुणे बंदमध्ये काही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी शहराच्या प्रमुख रत्स्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.