बारामती : छत्रपती शिवरायांचे व्यवस्थापन आधुनिक युगातदेखील सर्वांत प्रेरणादायी व उपयुक्त आहे. वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, गडकोट किल्ल्यांची मजबूत बांधणी, रयतेविषयी प्रेम आस्था व काळजी या गुणांमुळेच छत्रपती शिवराय आजही संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत, असे मत डॉ. अजित आपटे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिशाला शिक्षण मंडळ, पुणे व विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत डॉ. अजित आपटे बोलत होते. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प डॉ. विलिना इनामदार यांनी ‘सौंदर्य मनाचे व शरीराचे’ या विषयातून गुंफले. शारदानगर येथील डॉ. नीलेश महाजन यांना ‘योग व आरोग्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून योगाचे महत्त्व पटवून दिले. याच कार्यक्रमात महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी नागवडे हिचा तिच्या योगातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमला महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद हे उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्रा. राजकुमार कदम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात व्याख्यानमालेचा हेतू व वक्त्यांची भूमिका विषद केली. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. पंढरीनाथ साळुंखे, प्रा. दादासाहेब मगर, डॉ. हणमंतराव पाटील, प्रा. नीलिमा पेंढारकर, डॉ. राहुल तोडमल व डॉ. मंगल ससाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. अजय झेंडे या विद्यार्थ्याने फलक लेखन तर अमृता जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.