बारामती : तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठे वनक्षेत्र म्हणून कळसचा उल्लेख होतो. कळससह इंदापूर तालुक्यात ६ हजार हेक्टरवर वनक्षेत्र पसरले आहे. इंदापूर वनक्षेत्रामध्ये खोकड, चिंकारा, मोर, कोल्हा, लांडगे, तरस आदीसह लहान-मोठे पशुपक्षी आढळतात. भादलवाडी तलाव आणि उजनी धरण परदेशी पक्ष्यांचे सारंगगार म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी भादलवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने चित्रबलाक आणि बगळ्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली. विणीच्या हंगामासाठी हे पक्षी दर वर्षी इंदापूर तालुक्यात येत असतात. यंदा प्रथमच बगळ्यांनी वालचंदनगर परिसरात वस्ती केली. मार्च महिन्यापासूनच येथील तापमानाने चाळिशी ओलांडली. परिणामी येथील वनक्षेत्रातील गवत, पाणवठे पूर्णपणे सुकून गेले. दर वर्षी उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. साहजिकच त्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष होतो. चारा-पाण्याच्या शोधार्थ फिरणारे वन्यजीव अपघातात बळीदेखील पडतात. इंदापूर वनविभागाने वनक्षेत्रातील कोरड्या टाक्या भरण्यासाठी दोन टँकरची सोय केल्याचे सांगितले. मात्र, ६ हजार हेक्टर वनक्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यात दोन टँकरच्या साहाय्याने वन्यजीवांची कितपत तहान भागणार, असा प्रश्न प्राणिमित्रांमधून विचारला जात आहे. (वार्ताहर)इंदापूर वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक पाणवठे जास्त आहेत. तसेच, वनक्षेत्रात जलसंधारणाची कामेदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या दोन टँकरद्वारे कळस भागातील पाणवठ्यात पाणी सोडण्याची सोय केली आहे. पुढील दोन दिवसांत कळस भागातील सर्व पाणवठे भरण्यात येतील. - राहुल काळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर)
कडक उन्हाचे वन्यजीवांना चटके
By admin | Published: April 11, 2017 3:45 AM