विशेषतः लहान मुलांना (१० वर्षांपर्यंत) चिकोरीची जास्त गरज पडते. कुटुंबातील व्यक्तींचे ध्यान सतत आपल्याकडे आकर्षित करतात. निगेटिव्ह चिकोरी अवस्था दुर्लक्ष करण्यासारखी नसते. कारण त्यात प्रत्येकाची शक्ती खर्च होते. स्त्री व पुरुष दोघांमधेही अशी अवस्था उत्पन्न होऊ शकते. या अवस्थेत स्वतःच्या भावना, वस्तू व कल्पना व्यक्ती आपल्याकडून सोडून देत नाही.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुलगा हा म्हातारपणीचा आधार, आपल्याला पैसे कमावून देणार या भावनेने त्याचे संगोपन करणारी आई. आता प्रत्येक मूल अशा मालकी हक्क गाजविणाऱ्या आईच्या प्रेमातून सुटका करून घेईलच असे नाही. कित्येक वर्षे आईच्या मुठीत राहिल्याने मुलांची स्वतःची प्रगती नीटशी होत नाही. निगेटिव्ह चिकोरीच्या टोकाच्या अवस्थेत हिस्टेरिया, अर्थशून्य भावनांचा उद्रेक होण्याचा संभव असतो.
आता प्रश्न असा पडतो की असा शोचनीय स्वभाव बनतोच कसा? तर प्रत्येक निगेटिव्ह चिकोरी अवस्थेच्या मागे अंतर्गत रिक्तपणाची भावना असते. आयुष्यात काहीतरी मिळवायचे राहून गेलेले असते. यांना नेहमी असे वाटत असते की आपण इतरांना नकोसे झालो आहोत, आपल्याला योग्य प्रेम, माया मिळत नाही. यांच्या बालपणी यांना कदाचित आईची माया, वडिलांचे प्रेम व इतर नातेवाईकांचे प्रेम तसेच विवाहानंतर पतीचे, सासरच्या मंडळींचे प्रेम, आधार मिळालेला नसतो. काहींच्या विवाहानंतर त्यांचे आई-वडील त्यांच्यापासून दुरावतात. त्यामुळे यांना सतत प्रेमाची व ऐहिक सुखाची हाव असते. आपल्या अखत्यारीतील प्रत्येक गोष्टीवर मालकी हक्क सांगतात.
आता निर्जीव अशा पेन, रुमाल, घर, गाडी इत्यादी गोष्टींवर मालकी हक्क गाजविणे एकवेळ समजू शकतो (?) पण ... सजीव अशा मुलगा किंवा मुलगी यांच्यावर असा हक्क गाजविणे हे त्या मुलांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या व पर्यायाने विश्वात्म्याच्या विरोधातील कृती होत नाही का? मग त्याचे परिणाम भोगावे लागणारच. जबरदस्त इच्छाशक्ती व योग्य नियोजनाद्वारे विपरीत चिकोरी स्थिती हाताळता येते.
खरं तर यांच्यामधे प्रेम, माया करण्याची अंतर्गत शक्ती भरपूर असते. पण ती शक्ती मानसिक घुमजाव केले तरच उपयोगात आणता येते. चिकोरी पुष्पौषधीचे सेवन सुरु केल्यानंतर वैश्विक, खऱ्या मातृत्वाची भावना मनात जागृत होते. डॉ. बाख यांनी पॉझिटिव्ह चिकोरी अवस्थेला "विश्वाची माता" असेच संबोधिले आहे. हा मातृभाव स्त्री व पुरुष दोघांमधे सुप्त अवस्थेत असतो आणि म्हणूनच की काय आपल्याकडेही आपण सर्व संतमंडळींना "माउली" अशीच हाक मारतो. शिष्यगणसुद्धा आपल्या गुरूंना "गुरुमाऊली" असेच म्हणतात.
पॉझिटिव्ह चिकोरी अवस्थेत कोणत्याही परतफेडीच्या अपेक्षेशिवाय प्रेम दिले जाते. स्वार्थरहित माया केली जाते. त्यामुळे यांच्या उबदार पंखाखाली सर्वांनाच सुरक्षित वाटते, आसरा मिळतो.
प्रमुख लक्षण – मालकी हक्क, सततची मागणी, हव्यास, मनाप्रमाणे जवळची माणसे वागली नाही तर संताप, खेद इत्यादी.
ऊर्जा अवरोधाची लक्षणे – इतरांना दुबळे करणे, स्वतःच्या इच्छेनुसार माणसांना राबविणे, टीका करण्यात तसेच दोष दाखविण्यात आनंद, आपल्या माणसांच्या जीवनावर अंकुश ठेवण्यासाठी ती सतत जवळ असावी लागतात, दुस-यांवर सर्व गोष्टी थोपवितात, स्वार्थी, अटी असणारे प्रेम व माया, इमोशनल ब्लॅकमेल करणे, आपल्या काळातील नात्यांचा सतत संदर्भ देणे, माफ करणे व विसरणे अवघड जाते, नाती तुटण्याची तसेच मालकीची वस्तू गमावण्याची गुप्त भीती, स्वतःची दुःखे रंगवून सांगणे, हिस्टेरिया, प्रेमभंग, अपेक्षाभंग, प्रेमात वाटेकरी (दुसरा भाऊ किंवा बहीण) नको असणे, दुस-यांनी आपल्याला काय देणे लागते ते सांगणे, आईला चिकटून बसणारी मुले इत्यादी.
औषध सेवनानंतर स्वभावात होणारे बदल – विश्वव्यापक मातृत्व, दुसऱ्यांची काळजी करणारे खरे प्रेम व समर्पण, कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा न ठेवता आपल्याकडील वस्तू, गोष्टी, पैसा इ. देतात, स्वतःला सुरक्षित अनुभवतात, मायेची उब, संवेदनशीलता, खरा दयाळूपणा, क्षमाशील स्वभाव, इतरांना अभय व सुरक्षितता देतात, वगैरे.
सहाय्यक उपचार – शरीर व मन शिथिल करण्याचे उपाय करावेत, मालिश करणे, हृदयस्थ चक्र मजबूत करण्यासाठी दीर्घश्वसन करणे.
स्वयंसूचनेसाठी घोषवाक्ये – १) मी न मागता देत आहे, २) मी माझा मालकीहक्क पूर्णपणे सोडून देत आहे, ३) मी प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करीत आहे, ४) मला उच्चदर्जाचे स्रोत – दया, क्षमा, शांती इ. प्राप्त होत आहेत, ५) मला सुरक्षित वाटत आहे, ६) माझ्यात दैवी गुण जागृत होत आहेत.
क्रमशः …
वैधानिक इशारा : सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे.