नितीश गोवंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: अनेकदा न्यायालयात काम करताना एखाद्या प्रकरणावर काेणते उपाय सूचवावेत हे आपल्याला सूचत नाही. ज्यावेळी अयोध्येचे काम माझ्यापुढे आले होते, त्यावेळी ३ महिने आम्ही अयोध्येच्या कामावर विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्यावर कुणी उपाय काढला नाही ते काम आमच्यापुढे आले. हे काम सुरू असताना यातून मार्ग कसा शोधायचा हे कुणालाही माहीत नव्हते. मी दैनंदिन जीवनात दररोज पूजा करतो, त्यामुळे मी भगवंतासमोर बसलो आणि त्यांनाच यातून मार्ग शोधून द्या, अशी प्रार्थना केली. मनात आस्था असेल तर मार्ग नेहमी निघतो असे मला वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
रविवारी सरन्यायाधीश त्यांच्या मूळ गावी खेड तालुक्यातील कनेरसर येथे असताना त्यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. सय्यद, न्या. एस. बी. पोळ, न्या. एस. बी. पवार, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आदी उपस्थित होते.
देवीच्या कृपेमुळे मी सरन्यायाधीश झालो
गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे मला कायम वाटते. कनेरसर गावासोबतचे माझे नाते लहानपणापासून आहे, या शब्दांत चंद्रचूड यांनी भावना व्यक्त केल्या.
जंगी स्वागत, रमले कुटुंबीयांत
राजगुरूनगर : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मूळ गावी कनेरसर (ता. खेड) येथे कुटुंबीयांनी, तसेच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. जुन्या वाड्यात चंद्रचूड सुमारे पाऊणतास कुटुंबीयांसमवेत रमले होते. गावात व रस्त्यावर स्वागताचे फलक झळकत होते. सर्व कुटुंबीय स्वागतासाठी वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. वाड्यात रांगोळी काढून तोरण लावून वाडा सजला होता.