Shambhuraj Desai: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनीच आणली; शंभूराज देसाईंचा दावा
By राजू इनामदार | Published: September 13, 2024 03:45 PM2024-09-13T15:45:59+5:302024-09-13T15:46:20+5:30
फक्त लाडकी बहिण योजना म्हणू नका, या योजनेचे सरकारी नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे व ते तसेच घेत जा
पुणे: लाडकी बहिण योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असेच आहे. मी दौरे करत असतो. अनेक गावांमध्ये शेकडो महिलांना भेटलो. योजनेबद्दल विचारले, त्यावेळी त्या सांगतात ही योजना शिंदेसाहेबांनीच आणली असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
फक्त लाडकी बहिण योजना म्हणू नका, या योजनेचे सरकारी नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे व ते तसेच घेत जा असेही त्यांनी पत्रकारांना बजावले. आता सर्वांनाच या योजनेचे नाव माहिती झाले असून ते तसेच नाव घेतात असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी देसाई सहकुटुंब श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या अभिषेकासाठी म्हणून आले होते. पूजा करून ते निघत असतानाच तिथे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले.
दोघांनीही गळाभेट घेत देवाच्या दारात राजकारण नको म्हणत या विषयांवरील प्रश्न टाळले. देसाई यांनी सांगितले की ते दरवर्षी सहकुटुंब दगडुशेठ गणपतीच्या अभिषेकासाठी म्हणून गणेशोत्सवात येतात. देसाई यांनी दानवे यांची गळाभेट घेतली. पत्नीबरोबर त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना देसाई म्हणाले, ”दानवे माझे जुने मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आमची चांगली ओळख आहे.“ देवाच्या दारात राजकारण नको, त्याविषयी काहीही प्रश्न विचारू नका असे म्हणत देसाई यांनी भेटीविषयी बोलणे टाळले.