रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 08:39 AM2024-08-17T08:39:15+5:302024-08-17T08:39:46+5:30

प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Chief Minister Deputy Chief Minister will come to pune 15 thousand sisters will be present in cm ladki bahin yojana program | रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार!

रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार!

CM Ladki Bahin Yojana Maharashtra ( Marathi News ) : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी ही योजना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. अशातच या योजनेचा पहिला हप्ता नुकताच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथे होणार आहे.

राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील ५ लाखावर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.

दरम्यान, प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्रशासनाच्यावतीने सुरू असून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेकरिता उर्वरित पात्र महिलांना ३१ ऑगस्टअखेर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Chief Minister Deputy Chief Minister will come to pune 15 thousand sisters will be present in cm ladki bahin yojana program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.