पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलं होतं. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देतील. मात्र, पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टात देखील धाव घेत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. हा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? गुन्हा उशिरा का होईना दाखल झाला, त्याचे मी स्वागत करते. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टातदेखील धाव घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप न्यायालयात जाणार आहेत. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून चार अहवाल तयार करण्यात आले आहेत. मात्र, या अहवालामध्ये अडकण्यापेक्षा सत्य जे आहे, त्याच्यावर फोकस राहणं आवश्यक आहे. कुठला अहवाल काय म्हणतो, यात अडकायला नको, असंदेखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
बीडमध्ये बदल होताना दिसत नाही
बीडमधील वकील महिलेला मारहाण प्रकरणामध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीडमध्ये नक्की काय सुरू आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा बीडमध्ये बदल होताना दिसत नाही. चालक असलेल्या एका तरुणाचं किडनॅपिंग झालं असल्याची बीडमधील एक घटना माझ्यासमोर आली आहे. याबाबत पोलिस कोणतीही कारवाई करत नसल्याने या तरुणाच्या कुटुंबातील सदस्य माझ्या भेटीला आले होते. याबाबत मी पोलिस अधीक्षकांशी बोलले आहे. मात्र, बीडमध्ये दहशत नेमकी कुणाची आहे. की बीडमध्ये वर्दीलादेखील कुणी घाबरत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
ठाकरे बंधू युतीवर आनंद
उध्दव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आनंदच आहे. कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. कुटुंब एकत्र झालं आहे. त्याचा आनंद साजरा करू द्या. हा संस्कृत महाराष्ट्र आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा, हीच आपली संस्कृती असल्याचं, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.