मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'अजित पवार, भुजबळांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचेय'
By नितीन चौधरी | Updated: December 23, 2024 19:38 IST2024-12-23T19:35:31+5:302024-12-23T19:38:59+5:30
त्यांच्या मनात वेगळेच म्हणूनच हा प्रश्न, त्यावरही तोडगा काढू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'अजित पवार, भुजबळांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचेय'
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेता डावलले नाही. अजित पवार यांच्या मते त्यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळ यांच्या मनात वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही तिन्ही पक्षांचे नेते बसून त्यावर योग्य तो तोडगा काढू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यात त्यांना सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ते आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत. ते राष्ट्रवादीचे असल्याने तेथे त्यांचा सन्मान आहेच. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनातही त्यांच्याविषयी सन्मानाची भावना आहेच. महायुतीच्या विजयात त्यांचा वाटा राहिलेला आहे, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, अजित पवारही त्यांची चिंता करतात. अजित पवार यांनी त्यांना जेव्हा मंत्रिमंडळात घेतले नाही, तेव्हा त्यांचा भुजबळ यांना डावलण्याचा कोणताही हेतू नव्हता. याबाबत मी अजित पवार यांच्याशी बोललो. ते म्हणाले की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचे आहे. भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळ यांच्या मनात वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तिन्ही पक्षांचे नेते बसून तोडगा काढू.”
पालकमंत्रिपदाबाबत मंत्रिमंडळात कोणतेही स्पर्धा नसल्याचे स्पष्ट करून तिन्ही पक्षांच्या नेत्यांना याबाबत जबाबदारी दिली आहे. हे नेते एकत्र बसतील. येत्या दोन तीन दिवसांत त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता येत्या सात ते आठ दिवसांत वितरित करण्यात येईल असेही ते म्हणाले.
परभणी प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी कोठडीतील मृत्यूप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी केवळ राजकीय हेतूने ही भेट घेतली आहे. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम ते करत आहेत. राज्य सरकार संवेदनशील असल्याने या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यातून सर्व सत्य व तथ्य बाहेर येईल, त्यात काहीही लपविण्याचे नाही. चौकशीत कुठल्याही प्रकारे तसेच मारहाणीत हा मृत्यू झाल्याचे आढळल्यास कुणालाही सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शरद पवार यांनीही मला यात लक्ष घालण्यास सांगितले असून त्यांना मी यात पूर्ण लक्ष घातले असल्याचे सांगितले आहे.”
बीड येथील प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे, त्याबाबत फडणवीस यांनी असे करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. या प्रकरणाचीही चौकशी सुरू असून त्यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा संधी देण्यात आलेली नाही. सर्व राज्यांना आलटून पालटून संधी देण्यात येते. त्या दिवशी रस्त्यावर केवळ १५ रथांना परवानगी दिली जाते. मात्र, यंदा अन्य रथांचा नव्याने समावेश करायचा असल्यास तशी विनंती करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.