पुणे : निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आले हाेते, तेव्हा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले हाेते. ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. अधिवेशनात जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
राजू शेट्टी म्हणाले, महाविकासआघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याचे आश्वासन दिले हाेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विचारभिन्नता असताना ते एकत्र आले हाेते. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. मागचे वर्ष हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष हाेते.त्यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर सरकारकडून दिलाश्याची अपेक्षा हाेती. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ दाैऱ्यावर गेले तेव्हा 25 हजार रुपये देऊ असे म्हंटले हाेते, परंतु ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. केंद्राची अनेक पथके दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आली परंतु केंद्राकडून अजूनही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अधिवेशनातील कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी हाेती.
स्वाभिमानीच्या पुर्नबांधणाबाबत बाेलताना शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाची पुनर्रबांधणी करण्याचे काम सुरु आहे. नवी कार्यकारणी करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या आहेत. येत्या 22 तारखेला शिर्डीला बैठक घेण्यात येणार आहे, त्यात जिल्हा, राज्य पातळीवरच्या नेमणुका हाेतील. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जनआंदाेलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.