मंचर : ''दत्ता कसा आहेस ?'' ''मंचरकरांची काळजी घे, तुम्ही चांगले काम करत आहात.'' अशी कौतुकाची थाप खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांना दिली. ''तुमच्या भरवशावरच कोरोनाशी आपण लढा देत आहोत'' असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी थेट सरपंच गांजाळे यांना दुपारी दूरध्वनी करून कामाचे कौतुक केले व कोरोनाचा मुकाबला सर्वजण मिळून करू असा विश्वास दिला.
आंबेगाव तालुक्यातील ५० हजार लोकसंख्येचे गाव असणाऱ्या मंचर शहराचे सरपंच दत्ता गांजाळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून सरपंच व ग्रामस्थांनी राबविलेल्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे दूरध्वनीवरून कौतुक केले. ''दत्ता कसा आहेस ?'' अशी आपुलकीने विचारपूस करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच गांजाळे करत असलेल्या कामाचे कौतुक केले. ''मंचरकर कसे आहेत ?'' त्यांची काळजी घ्या, अत्यावश्यक सेवा पुरवताना मास्क लावणे कंपल्सरी करा'' असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. सरपंच गांजाळे यांनी ते करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शहराची लोकसंख्या पन्नास ते साठ हजार असताना केवळ एक ते दोन टक्के लोक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत आहेत. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील या संदर्भात आवर्जून मार्गदर्शन करत असल्याचे गांजाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
मंचर शहराची व तुमची सर्वांची काळजी घ्या असा सल्ला ठाकरे यांनी देताच ''तुम्ही सुद्धा काळजी घ्या'' असे गांजाळे उद्धव ठाकरे यांना म्हणाले.यावेळी ''तुमच्या भरवशावरच हे सर्व सुरू आहे.'' असे उत्तर ठाकरे यांनी दिले. आंबेगाव तालुक्यातील जवळपास ५० हजार लोकसंख्या असणारं मंचर हे तालुक्यातील सर्वात मोठं गाव. महिना-दीड महिन्यांपूर्वी आपल्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने देशात खळबळ उडाली होती. मात्र सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नियोजन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. व दिनांक २० मार्च रोजी संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला.