मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 06:21 PM2024-02-29T18:21:39+5:302024-02-29T18:24:07+5:30
बारामती शहरी आपण प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद असून माझ्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा - शरद पवार
बारामती : बारामतीत शनिवारी विविध विकासकामांच्या उदघाटनासह ‘नमो’ रोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी महायुतीचे दिग्गज नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवास`थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे.
याबाबत ज्येष्ठ नेते पवार यांनी या तिन्ही बड्या नेत्यांना सहिचे पत्र पाठविले आहे. या पत्रात शरद पवार यांनी नमूद केले आहे की, आपण शनिवारी (दि २) बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. याकरीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो.
आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा, असं पवारांनी पत्रामध्ये नमुद केले आहे.
...शरद पवारांच्या आमंत्रणाची चर्चा
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काॅंग्रेस च्या दोन्ही गट आमने सामने आले आहेत. दोन्ही बाजुने टीकेच्या फैरी सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दररोज आरोप प्रत्यारोप सुरु आहे. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी पत्र पाठवुन दिलेल्या भोजनाच्या आमंत्रणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.