आळंदी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.८) तीर्थक्षेत्र आळंदीच्या दौऱ्यावर येणार आहेत. आळंदीतील मृदुंगज्ञान गुरुकुल शिक्षण संस्था आयोजित पंडित दासोपंत स्वामी आळंदीकर भव्य संगीत महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी होणार असल्याची माहिती पंडित दासोपंत स्वामी यांनी दिली.
तीर्थक्षेत्र आळंदीतील चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी मठात संगीत महोत्सव कार्यक्रम आहे. यंदा या महोत्सवाचे हे २७ वे वर्ष आहे. या महोत्सवातील मृदुंग दिंडीत शनिवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. सुमारे एकरा हजार मृदुंग वादकांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जंगी सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसाठी दुपारी एक ते दोन हा एक तासाचा वेळ आरक्षित करण्यात आला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तीर्थक्षेत्र आळंदी शहरात येणार आहेत. मुंबईतील दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीत वारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमासाठी जरी ते आळंदी शहरात येत असले तरीसुद्धा त्यांच्या दौऱ्याची चर्चा शहारात रंगू लागली आहे.