पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते पिंपरी-चिंचवड शहरात तळ ठोकून आहेत. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिंचवड दौरा होता. मात्र, त्यासाठी पोलिसांनी रात्र जागून काढावी लागली. तसेच नेत्यांचीही पहाटेपर्यंत राजकीय खलबते सुरू होती.
मुख्यमंत्री, राज्यपाल यांचा दौरा असल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो. अचानक दौऱ्यात बदल केला तर त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण पडत असतो. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यातच अचानकपणे मंत्र्यांचे दौरे बदलतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येणार असल्याचा निरोप सोमवारी सायंकाळी आला. आठ वाजता पिंपळे गुरव आणि त्यानंतर थेरगाव येथील खासदार यांच्या निवासस्थानी येणार असल्याचे सुरक्षा यंत्रणेला कळविण्यात आले. कोथरूड मार्गे वाकड, जगताप डेअरी रस्त्याने पिंपळे गुरवला जाणार आणि तेथून थेरगाव येथील खासदारांच्या निवासस्थानी बैठक घेणार, असे नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक चौकात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने विशेष पथके तैनात केली होती. चौक, रस्त्यावर, जोड रस्त्यावर वाहतूक पोलिस तैनात केले होते. हिंजवडी, वाकड, सांगवी, चिंचवड पोलिस ठाण्यांचे कर्मचारी रस्त्यांवर तैनात होते.
दौऱ्याचे रात्रीस खेळ चाले
आठनंतर पुन्हा मॅसेज आला, की रात्री नऊला, त्यानंतर काही वेळाने दहाची, त्यानंतर अकराची, अशी वेळ लांबत गेली. त्यानंतर सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री ताफा शहरात आला, पिंपळेगुरवला पोहोचला. त्यानंतर पहाटे साडेतीनला ताफा खासदारांच्या निवासस्थानी पोहोचला. साडेचारपर्यंत बैठक सुरू होती. यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते. चिंचवड विधानसभेवर चर्चा झाली. तसेच शिवसेना संघटनात्मक वाढीसाठी सूचना करण्यात आल्या. साडेचारला ताफा पुण्याकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर पोलिसांची सुटका झाली.