मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून यासंदर्भात विनंती केली आहे.
कसबा पेठ येथून भाजपने हेमंत रासने यांना तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून शनिवारी रात्री सर्व पक्षश्रेष्ठींना फोन करण्यात आले. एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यास त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, कसबा आणि चिंचवडसाठी अर्ज भरण्यासाठी ७ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे आवाहन करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना फोन नाही- या पोटनिवडणुकीसाठी शिंदे यांच्याकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आला नाही. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे संपर्क केला नाही. होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून सहकारी पक्षासोबत राहू.
- अंधेरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली. पंढरपूरला झाली. तिथे अपवाद पाळला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले असले तरी आणि राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असले तरी या दोन्ही निवडणुका बिनविरोध होणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही : पटोलेकसबा विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी भाजपने टिळक परिवाराला दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जो प्रस्ताव दिला होता, त्याला आता अर्थ राहिला नाही. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
राज यांचे पत्राद्वारे आवाहनअंधेरी पूर्व विधानसभेच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा मविआ नेत्यांनी दाखवावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज दाखल करणारपुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.