पुणे : गिरिप्रेमी या गिर्याराेहण संस्थेच्या गिर्याराेहकांनी जगातील तिसरे उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’वर यशस्वी चढाई करुन गिर्याराेहण इतिहासामध्ये नवा अध्याय रचला. या गिर्याराेहकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे काैतुक करुन भारताचे नाव जगाच्या नकाशावर उज्वल केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी कांचनजुंगा मोहिमेचे नेते व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे, चंदन चव्हाण (गिरिप्रेमीचे उपाध्यक्ष), भूषण हर्षे (एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर), आनंद माळी (एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर), कृष्णा ढोकले (एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर), विवेक शिवदे (कांचनजुंगा शिखरवीर), जितेंद्र गवारे (कांचनजुंगा शिखरवीर), किरण साळस्तेकर (कांचनजुंगा शिखरवीर) व ओंकार हिंगे (गिर्यारोहक, गिरिप्रेमी सदस्य) तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
१५ मे २०१९ च्या पहाटे गिरिप्रेमी संस्थेतील १० गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली. ही मोहीम कांचनजुंगा शिखर चढाई करण्यात यशस्वी ठरलेली सर्वात मोठी व सर्वात पहिली नागरी मोहीम ठरली आहे. एकाच वेळी एकाच संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखरमाथ्यावर चढाई करण्याची पहिलीच वेळ आहे. यातून एक नवा विश्वविक्रम गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी प्रस्थापित केला आहे. या मोहिमेच्यावेळी फक्त भारतीयच नव्हे तर विविध देशांतून आलेल्या ३० हून अधिक गिर्यारोहकांचे नेतृत्व देखील गिरिप्रेमीने केले. अशा विविध गोष्टींमुळे ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ही सर्व माहिती सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यांनी गिरिप्रेमीच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले व पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.